प्रतिनिधी । सोलापूर
जवळा, ता. सांगोला येथे अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई करत १५ लाख १ हजार २८० रुपये किमतीचा ३७ हजार ५३२ लिटर भेसळयुक्त दुधसाठा जागेवरच नष्ट केला. तसेच संबंधित आस्थापनेस त्रुटीची पूर्तता करेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत, अशी माहिती सहाय्यक आयुक्त (अन्न) साहेबराव देसाई यांनी दिली.
आज दिनांक ११ जुलै रोजी सोलापूर कार्यालयास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी श्री. गणेश म. कदम व सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी श्री. मंगेश म. लवटे यांनी बुरुंगेवाडी, जवळा येथील मे. अंजिक्यराणा मिल्क इंडस्ट्रीज या ठिकाणी अचानक धाड टाकली. तपासणी दरम्यान ४ दुधाचे नमुने घेण्यात आले असून उर्वरित ३७ हजार ५३२ लिटर दूध जप्त करण्यात आले.
तपासणीत १. संकलन व चिलिंग युनिटचा वैध परवाना नसणे, २. स्पॉट टेस्टमध्ये दुधात पाणी मिसळल्याचे आढळणे, ३. एसएनएफचे प्रमाण विहित मर्यादेपेक्षा कमी असणे, ४. खरेदी-विक्रीची पद्धतशीर नोंद नसणे व ५. ‘अनुसूची IV’ मधील नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. दूध नाशवंत असल्यामुळे सदरचा साठा जागेवरच योग्य पद्धतीने नष्ट करण्यात आला.
तसेच आस्थापनेस तपासणीत आढळलेल्या त्रुटींची पूर्तता होईपर्यंत व वैध अन्न परवाना घेईपर्यंत तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सदरची कारवाई आयुक्त श्री. तुकाराम मुंढे, अन्न व औषध प्रशासन, मुंबई व सह आयुक्त (पुणे विभाग) श्री. दि. वा. भोगावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (अन्न) साहेबराव देसाई व अन्न सुरक्षा अधिकारी गणेश कदम, सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांच्या पथकाने केली.
