
सब हेड । प्रशासन झोपेत आहे का ? नागरिकांचा सवाल
प्रतिनिधी । सोलापूर
भवानी पेठेत नववर्षाच्या चिमुकल्याचा रेबीज मुळे मृत्यू झाल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.
समर्थ योगीनाथ स्वामी (वय ९, रा. भवानी पेठ) असे मृत मुलाचे नाव आहे. त्याला झालेल्या छोट्या जखमेला कुत्र्याने चाटल्याने रेबीज चा संसर्ग होऊन या बालकाचा मृत्यू झाल्याचे सत्य समोर आले आहे. ही विचित्र आणि हृदयद्रावक घटना घडल्याने भवानी पेठ परिसरातील नागरिकात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे प्रशासनाबद्दल प्रचंड नाराजी आणि संताप असून प्रशासनाने भटक्या कुत्र्यांबाबत ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी समर्थ ला एक छोटी जखम झाली होती. ती जखम खेळत असताना भटक्या कुत्र्याने चाटली मात्र एवढ्या छोट्या गोष्टीचे रूपांतर एवढ्या मोठ्या संकटात होईल असे वाटले नव्हते. दोन-तीन दिवसापासून समर्थला बरे वाटत नसल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आणि पाहता पाहता गुरुवारी रात्री उशिरा समर्थ कुटुंबीयांपासून हिरावला गेला. समर्थचा मृत्यू रेबीजच्या संसर्गामुळेच झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे.
पीपीई किट घालून केले शवविच्छेदन
रेबीज या संसर्गाचा धोका पाहता डॉक्टरांनी पीपीई किट घालून त्या चिमुकल्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आई करते मजुरी वडील आजारी
समर्थ च्या घरची परिस्थिती प्रचंड हालाखीचे असून आई मोलमजुरी करते तर वडील गेले अनेक दिवस अंथरुणाला खेळून आहेत त्यातच काळाने हा घाला घातल्याने कुटुंबीयांवर हा दुःखाचा
डोंगर कोसळला आहे.
भटक्या कुत्र्यांचा विषय संपणार कधी ?
शहरात अनेकदा लहानग्या मुलांवर हल्ले करून भटक्या कुत्र्यांनी त्यांना जखमी केल्याचे लचके तोडल्याचे प्रसंग आजवर घडले आहेत. पण आता समर्थच्या रूपाने सोलापुरात एका चिमुकल्याने जीव गमावल्याची गंभीर घटना घडली आहे. आता तरी प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देईल का असा प्रश्न भवानी पेठेतील नागरिकांनी विचारला आहे.