सब हेड । प्रा. हाके यांची पत्रकार परिषद

प्रतिनिधी । सोलापूर
कुणबी समाजाला ओबीसी आरक्षणाचा दाखला देण्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू केल्यानंतर सोलापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलेल्या टीकेला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रत्युत्तर दिले. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत हाके यांनी जरांगे पाटील यांच्यासह सरकारवरही निशाणा साधला.
‘राज्यातील ओबीसी आरक्षण संपले आहे की नाही, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे. मराठा-कुणबींनी ओबीसींच्या जागा घेतल्या असून, त्यामुळे मूळ ओबीसींचे नुकसान होत आहे,’ असा आरोप हाके यांनी केला. जात पडताळणी समितीवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, कुणबीची चार प्रमाणपत्रे रद्द झाल्यानंतर जरांगे आक्रमक झाले असल्याचेही त्यांनी म्हटले.
मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांबाबत वापरल्या जाणाऱ्या भाषेवरूनही हाके यांनी जरांगे यांच्यावर टीका केली. ‘महसूलमंत्र्यांच्या व्यंगावर बोलणे हा वर्णभेद नाही का? राज्यातील पुरोगामी कुठे गेले?’ असा सवाल त्यांनी केला. तसेच शिक्षक भरतीतील आरक्षण, रोस्टर आणि ओबीसींच्या हक्कांवरून सरकारला जाब विचारला.
‘महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरू आहे. आज ओबीसी समाज जात्यात आहे, उद्या दलित बांधवांचीही हीच अवस्था होऊ शकते. त्यामुळे दलित बांधवांनी आमच्यासोबत यावे,’ असे आवाहन हाके यांनी केले. यावेळी आमदार प्रसाद लाड यांच्यावरही त्यांनी जोरदार टीका केली.