
प्रतिनिधी । सोलापूर
प्रेमप्रकरणाच्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाला लाकूड, वायर आणि हाताबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना माळूंब्रा (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथे घडली आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या अरविंद बाळू मस्के (वय २७, रा. तरटगाव, जि. सोलापूर) या तरुणाचा श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी मृत अरविंद याच्या आई रुक्मिणी बाळू मस्के यांनी दिलेल्या तक्रारीवरून विशाल व ओंकार वडणे यांच्यावर तामलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोन्ही मुख्य आरोपींना अटक केली आहे.
मृताच्या आईने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, १५ ऑगस्ट रोजी माळूंब्रा गावाजवळील हायवेवर आरोपींनी अरविंदला गाठले. आरोपी विशाल वडणे आणि ओंकार वडणे यांनी इतर साथीदारांसह मिळून अरविंदला झाडाला बांधून तसेच लटकवून लाकूड, वायर व हाताबुक्क्यांनी अत्यंत क्रूरपणे मारहाण केली. मारहाणीदरम्यान त्याच्या चेहऱ्यावर लघवी करून अमानुष कृत्य केल्याचा गंभीर आरोपही आईने केला.
मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या अरविंदला त्याच्या नातेवाईकांनी तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात १०८ ॲम्बुलन्सद्वारे दाखल केले होते. मात्र, संपूर्ण शरीरावर गंभीर दुखापती असल्याने गेल्या आठवडाभरापासून त्याची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर २२ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी
खून, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, गंभीर स्वरूपाचा अत्याचार असे विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. प्रकरणातील दोन्ही आरोपींना शनिवारी रात्री अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींची ओळख निष्पन्न करण्याचे काम सुरू आहे. सध्या ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे. त्या ठिकाणी सीसीटीव्ही आहेत का याची तपासणी सुरू आहे.अशी माहिती मनोहर पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी, धाराशिव
