
प्रतिनिधी । सोलापूर
उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव हद्दीतील ‘सुखसागर ऑर्केस्ट्रा बार’वर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी मध्यरात्री छापा टाकून कारवाई केली. बारमध्ये नियमांचे उल्लंघन करून अश्लील पद्धतीने नृत्य सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या कारवाईत २६ गिऱ्हाईकांसह संबंधित चालक-मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, २८ लाख २५ हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या निर्देशानुसार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रविवारी रात्री १२.१५ वाजता बारवर छापा टाकला. यावेळी महिला नृत्य करत असताना ग्राहकांकडून त्यांच्यावर नोटा उधळल्या जात असल्याचे आढळून आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांसह कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.
कारवाईदरम्यान उपस्थित १५ महिलांसह ग्राहकांची चौकशी करून त्यांची माहिती नोंदविण्यात आली. घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाईल हँडसेट आणि इतर साहित्य असा एकूण २८ लाख २५ हजार १० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई सपोनि श्वेता चव्हाण, सपोनि विश्वजीत भोसले, सपोनि शारदा घोळवे, सपोनि प्रवीण जर्दे, पोलीस अंमलदार प्रविण वाळके, निलेश जानकर, आदित्य कांबळे, अनिल पवार आदींच्या पथकाने केली. जिल्ह्यात अवैध धंदे, नियमबाह्य डान्सबार किंवा अश्लील नृत्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नसून, अशा कृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांसह संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिला आहे.
