
प्रतिनिधी । सोलापूर
रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा रचून अटक केली. अल्तमश मुस्तफा शेख (वय ३१, रा. तुळसी नगर, बिस्मिल्ला बेकरी जवळ, खाडीपार, भिवंडी, जि. ठाणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ५६.९४० ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी), १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि रोख रक्कम, असा एकूण १ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. न्यायालयाने आरोपीला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सदर बाजार पोलिस बुधवारी, २३ सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास रेल्वे स्टेशन परिसरात गस्त घालत होते. यावेळी रेल्वे स्टेशनबाहेरील ब्रिजजवळील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या वाहन पार्किंगमध्ये एक संशयित तरुण थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ५६.९४० ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) आढळून आले. जप्त केलेल्या एमडीची किंमत १ लाख ७० हजार ८२० रुपये आहे.
प्राथमिक तपासात आरोपी हा हा अमली पदार्थ सोलापूर शहरात विक्री करण्याच्या उद्देशाने भिवंडीहून घेऊन आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, अमली पदार्थाचा पुरवठा कोणी केला आणि तो कोणाला विकला जाणार होता, या दिशेने पोलिस तपास करीत आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे, पोलिस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. प्रमुख सपोनि राहुल सावंत तसेच अंमलदार मुलाणी, राजेश चव्हाण, प्रमोद पक्षाले, अय्याज बागलकोटे, विशाल बोराडे, उमेश चव्हाण, हणमंत पुजारी, अमीन शेख, सागर गुंड, सोमनाथ सुरवसे, काशिनाथ वाडेकर आणि आनंद निंबाळकर यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि राहुल सावंत करीत आहेत.



