पेटलेल्या दुचाकीचा हा व्हिडिओ …
प्रतिनिधी । सोलापूर
शहरात रविवारी (१८ ऑक्टोबर) आगीच्या दोन स्वतंत्र घटना घडल्याने खळबळ उडाली. दयानंद कॉलेज परिसरातील फर्निचर व गाद्यांच्या दुकानांना सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. कापूस, फोम, लाकूड आणि अन्य ज्वलनशील साहित्यामुळे आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले. या आगीत तीन आस्थापनांमधील साहित्य, यंत्रसामग्री आणि मालाचा साठा जळून मोठे नुकसान झाले. आग शेजारील दुकानांपर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुमारे दहा अग्निशमन बंबांच्या मदतीने पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे आग अधिक पसरू नये, यासाठी जवानांना मोठी कसरत करावी लागली. या दुर्घटनेत ‘सुपर स्टील गोडाऊन’, गादी कारखाना तसेच इलेक्ट्रिक वायरिंग आणि इतर साहित्य असलेल्या आस्थापनांचे मोठे नुकसान झाले. गाद्या तयार करण्यासाठी वापरला जाणारा कापूस व फोम तसेच फर्निचरचे लाकूड मोठ्या प्रमाणात असल्याने आग वेगाने पसरल्याचे सांगण्यात येते. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून घटनेची माहिती घेतली जात आहे.

या आगीत झालेल्या नुकसानीचा तपशील समोर येणे बाकी आहे. दरम्यान, शहरातील महापौर बंगल्याजवळ दुपारच्या सुमारास स्पोर्ट्स बाईकने अचानक पेट घेतल्याची दुसरी घटना घडली. अनिल सांदेवाल यांच्या मालकीची ही दुचाकी सर्व्हिसिंग करून घरी नेत असताना अचानक आग लागली. दुचाकीला आग लागल्याचे लक्षात येताच सांदेवाल यांनी गाडी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी माती टाकून आग विझविण्याचाही प्रयत्न केला; मात्र आगीचा भडका वाढत गेल्याने काही क्षणांतच संपूर्ण दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या घटनेत सांदेवाल यांनी प्रसंगावधान राखल्याने ते बचावले; मात्र दुचाकीचे मोठे नुकसान झाले. घटनेची वर्दी मिळताच अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ड्युटीवर असलेले फायरमन बंडू डोंगरे, महासिद्ध उमराणी आणि वाहनचालक इलियास शेख यांनी तत्परतेने पाण्याचा मारा करून दुचाकीची आग विझविली. शहरात एकाच दिवशी घडलेल्या या दोन आगीच्या घटनांमुळे अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
