
सब हेड । अंत्रोळी येथील ‘मेसर्स गणेश रामचंद्र आपटे प्रायव्हेट लिमिटेड’ या कारखान्यावरही छापा
प्रतिनिधी । सोलापूर
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जिल्ह्यात धाडसत्र राबवत सांगोला आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीन ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत खवा, पेढा, बासुंदी, खाद्यतेल, मलाई आणि पनीरसह एकूण १९ लाख ४३ हजार ६२८ रुपये किमतीचा संशयास्पद व निकृष्ट दर्जाचा अन्नसाठा जप्त करण्यात आला.
३० ऑक्टोबर रोजी सांगोला येथील ‘मेसर्स मातोश्री दूध डेअरी’वर छापा टाकून १९६ किलो खवा, १९८ किलो पेढा आणि ९८ किलो बासुंदी असा एकूण एक लाख ६९ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
२८ ऑक्टोबर रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील ‘मेसर्स एस. जी. ट्रेडर्स’वर पुणे भरारी पथकाने कारवाई केली. यावेळी २,२३० किलो रिफाइंड सोयाबीन तेल, १,३०७ किलो रिफाइंड पामोलिन तेल आणि २,६९८ किलो रिफाइंड व फ्रॅक्शनेटेड पामोलिन तेल असा एकूण १० लाख ६० हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथील ‘मेसर्स गणेश रामचंद्र आपटे प्रायव्हेट लिमिटेड’ या कारखान्यावरही छापा टाकण्यात आला. तेथून १,२९९ किलो मलाई आणि ९१७ किलो पनीर, लो-फॅट पनीरसह, असे एकूण सात लाख १३ हजार रुपये किमतीचे दुग्धजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.



