
सब हेड । तमिळनाडूतील सात आरोपी अटकेत ; सात गुन्हे उघड
प्रतिनिधी । सोलापूर
सोलापूर शहरात उघड्यावर पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून लॅपटॉप, रोकड व कागदपत्रे चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा फौजदार चावडी पोलिसांच्या डी.बी. पथकाने पर्दाफाश केला. तमिळनाडूतील सात आरोपींना अटक करण्यात आली असून महाराष्ट्र व तेलंगणातील सात गुन्हे उघडकीस आले आहेत.
६ जुलै रोजी पार्क चौक परिसरात तीन कारच्या काचा फोडून लॅपटॉप व कागदपत्रे चोरीला गेली होती. तसेच २८ जुलै रोजी सिद्धेश्वर मंदिर परिसरातील कारची काच फोडून चार लाखांची रोकड लंपास करण्यात आली होती. सीसीटीव्ही फुटेज व आरोपींच्या गुन्ह्याच्या पद्धतीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला.
६ ऑगस्ट रोजी आरोपी चोरीच्या उद्देशाने सोलापुरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर होम मैदान परिसरात सापळा रचून सात जणांना ताब्यात घेण्यात आले. आरोपी तमिळ भाषिक असल्याने दुभाष्याच्या मदतीने चौकशी करण्यात आली.
आरोपींकडून तीन लाख रुपये रोकड, लॅपटॉप बॅग व महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. फौजदार चावडी, बोळींज, तुळजापूर, दिघी आणि हैदराबादमधील महाकाली व पंजागुट्टा पोलिस ठाण्यांतील सात गुन्हे उघडकीस आले आहेत. न्यायालयाने आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, अप्पर आयुक्त अरुण देवकर, उपआयुक्त प्रीतम यावलकर व वरिष्ठ निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संजय शिरसागर व डी.बी. पथकाने केली.

