
प्रतिनिधी । सोलापूर
विनापरवाना देशी बनावटीची अग्निशस्त्रे व जिवंत काडतुसे विक्री करणाऱ्या टोळीचा अकलूज पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत सहा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १७ पिस्तुले, ४७ जिवंत काडतुसे आणि टाटा नेक्सॉन कार असा एकूण १८ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे माढा, पंढरपूर, सांगोला, सांगली तसेच कर्नाटक आणि मध्य प्रदेशापर्यंत पसरलेल्या बेकायदा शस्त्रविक्रीचे धागेदोरे समोर आले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विकास कैलास वजाळे (३१, रा. परीते, ता. माढा), राहुल सतीश माने (३४, रा. मिरज), महादेव बाळासाहेब कोरके (३०, रा. करकंब), विजय सदाशिव किरणगी (३४, रा. शिवणुर, कर्नाटक), अनिल पंचलाल मेहता (३२, रा. रांजणगाव, मध्य प्रदेश) आणि सुमित नाना लवटे (१९, रा. भुईटे वस्ती, सांगोला) यांचा समावेश आहे. प्रदीप पांडुरंग माने आणि शनि भारत बनसोडे हे दोघे फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.
१४ ऑगस्ट रोजी अकलूज पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार परीते येथील विकास वजाळे याला टाटा नेक्सॉन कारसह ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून दोन पिस्तुले व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. चौकशीत त्याने ही शस्त्रे राहुल माने याच्याकडून घेतल्याची आणि विविध ठिकाणी विक्री केल्याची माहिती दिली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी करकंब, सांगोला, अकोले खुर्द, मिरज आणि कर्नाटक येथे कारवाई करून आणखी शस्त्रे जप्त केली. विकास वजाळे याने मध्य प्रदेशातील अनिल मेहता याच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी सोनगीर, धुळे येथे सापळा रचून मेहता याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चार अग्निशस्त्रे व २५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्यानंतर राहुल माने यालाही टेंभुर्णी परिसरातून अटक करण्यात आली.
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, पंढरपूर विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कटे आणि अकलूज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अकलूजचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, सहायक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, भारतीय शस्त्र अधिनियम, बीएनएस तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. अटक सहाही आरोपींना न्यायालयाने २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे करीत आहेत.

